Wednesday, 9 July 2014

'हिंदु आतंकवाद' या शब्दप्रयोगाच्या विरोधात केलेले कार्य !

तृतीय अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीच्या समाज, राष्ट्र आणि धर्म 
यांच्या हिताचे कार्य  या उद्बोधन सत्रातील अभिभाषणे !
श्री. विक्रम भावे
१. विषयप्रवेश 
 'हिंदु आतंकवाद' किंवा 'भगवा आतंकवाद', हे तथ्यहीन शब्दप्रयोग राज्यकर्ते आणि प्रसारमाध्यमे यांच्या अभद्र युतीतून जन्माला आले आहेत. या शब्दप्रयोगांचे खंडण करण्याच्या हेतूने मी माझे अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांच्या मार्गदर्शनानुसार 'मालेगाव बाँबस्फोटामागील अदृश्य हात' हे पुस्तक लिहिले. या पुस्तकामुळे 'हिंदु आतंकवाद' या शब्दप्रयोगाच्या विरोधात कसे कार्य होत आहे, याविषयी मी आपल्याला सांगणार आहे.
तत्पूर्वी प्रथम माझी पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो. 'आम्ही पाचपुते' या मराठी नाटकात महाभारताचे विडंबन केले जात होते. या नाटकाला हिंदु जनजागृती समितीने जनजागृती, मूकनिदर्शने आदी सनदशीर मार्गांनी विरोध केला होता. जून २००८ मध्ये महाराष्ट्राच्या ठाणे शहरातील 'गडकरी रंगायतन' या नाट्यमंदिरात या नाटकाचा प्रयोग होणार होता. हा प्रयोग चालू होण्यापूर्वी नाट्यमंदिराच्या वाहनतळात एक स्फोट झाला. धर्मश्रद्धेचे भंजन करणार्‍या या नाटकाला हिंदु जनजागृती समितीचा विरोध असल्याने महाराष्ट्राच्या आतंकवादविरोधी पथकाने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या सदस्यांचे पूर्वग्रहदूषितपणे अन्वेषण केले. माझ्यासह ५ जणांना अटक करण्यात आली. या काळात पोलिसांनी आम्ही न केलेला अपराध स्वीकारावा, यासाठी आमचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. हा छळ किती अमानुष स्वरूपाचा होता, हे शब्दांत वर्णन करणेही कठीण आहे. राज्यकर्ते आणि प्रसारमाध्यमे यांच्याकडून 'हिंदु आतंकवादी' म्हणून माध्यमांत आणि समाजात आमची प्रतिमा निर्माण करण्यात आली. आमच्यापैकी चार जण निर्दोष सुटले असून माझ्यासह दोन जण जामिनावर सुटले आहेत, तेही १० वर्षांपैकी निम्मी, म्हणजे ५ वर्षांची शिक्षा भोगून झाल्यानंतर !  
२. 'हिंदु आतंकवाद आहे', हे सिद्ध करण्यासाठी शासन आणि पोलीस यांनी रचलेले महाभयंकर षड्यंत्र !
मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात असतांना महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे २००६ आणि २००८ मध्ये जे स्फोट झाले, त्यांतील हिंदु आणि मुसलमान आरोपींशी माझी भेट झाली. त्यांचे व्यक्तीगत जीवन, न्यायालयीन खटले, त्यांना पोलिसांकडून मिळालेली अपमानास्पद वागणूक, या विषयांवर त्यांच्याशी माझ्या अनेक चर्चा झाल्या. त्यांच्या खटल्यांविषयी मी बरेच साहित्यही वाचले. या चर्चा आणि साहित्य यांतून एक अत्यंत भयावह वास्तव माझ्यासमोर उभे राहिले. 'हिंदु आतंकवाद अस्तित्वात आहे', असे चित्र उभे करण्यासाठी एक महाभयंकर षड्यंत्र रचले गेल्याची मला निश्चिती झाली. त्यातूनच 'हे षड्यंत्र उघडकीस आणण्यासाठी पुस्तक लिहिले पाहिजे', असा विचार माझ्या मनात प्रबळ झाला.    
३. हिंदु आतंकवाद शब्दप्रयोगाचे पुराव्यांसह खंडण करणार्‍या 
'मालेगाव बाँबस्फोटातील अदृश्य हात' पुस्तकाची निर्मिती !
सदर पुस्तक लिहिण्याचा विचार मी माझे अधिवक्ते श्री. संजीव पुनाळेकर यांना सांगितला. त्यांनी या दोन्ही मालेगाव स्फोटांच्या प्रकरणांतील आरोपपत्रे, वेळोवेळी करण्यात आलेल्या याचिका, न्यायालयाने त्यांवर दिलेले निर्णय, माहितीच्या अधिकारात मिळालेली माहिती, विविध वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेली वृत्ते आणि लेख असे सर्व काही मला अभ्यासण्यासाठी दिले. त्यावरून 'हिंदु आतंकवाद' असे काही अस्तित्वातच नसून ते सिद्ध करण्याचा काँग्रेस शासनाचा आणि पोलिसांचा भयावह खटाटोप उघड करणारे कागदोपत्री पुरावे माझ्या हाती आले. माझ्याकडे असलेल्या माहितीला ही कायदेशीर माहिती जोडून 'हिंदु आतंकवाद' ही संकल्पना कशी कपोलकल्पित आहे आणि पोलिसांनी ती सिद्ध करण्यासाठी हिंदूंचा किती भयंकर छळ केला आहे, याचे मी संकलन करत गेलो.
पूर्वायुष्यात साधा लेखही मी लिहिला नव्हता; पण 'या विषयावर एक पुस्तक लिहू', असे ठरवल्यावर ४५ व्या दिवशी 'मालेगाव बाँबस्फोटातील अदृश्य हात' हे मराठी पुस्तक प्रकाशित झाले. हे कार्य केवळ ईश्वरी कृपेमुळेेच शक्य झालेे, अशी माझी ठाम श्रद्धा आहे.
४. 'भगवा आतंकवादा'चा आरोप लावण्यात आलेल्या हिंदु कार्यकर्त्यांच्या व्यथा !
'भगवा आतंकवाद' किंवा 'हिंदु आतंकवादी', असा भास समाजासमोर निर्माण करण्यासाठी काँग्रेस शासनाने जे षड्यंत्र रचले आहे, त्याचे बळी ठरलेल्या हिंदू कार्यकर्त्यांच्या व्यथा या पुस्तकात आलेल्या आहेत. त्यांपैकी काही निवडक सूत्रे मी आपल्यासमोर मांडतोे.
४ अ. 'हिंदु आतंकवादा'च्या बागुलबुव्याला पाठिंबा देणारी प्रसिद्धीमाध्यमे साध्वी प्रज्ञासिंग यांच्यावरील अत्याचारांविषयी असंवेदनशील ! : साध्वी प्रज्ञासिंग यांच्यावर मुंबईतील भायखळा कारागृहात असतांना एका मुसलमान महिलेने आक्रमण केल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांच्या तोंडावर आणि गळ्यावर वार झाल्याने बराच रक्तस्राव झाला. आक्रमण करणारी स्त्री मुसलमान असल्याने आजपर्यंत तिच्यावर काहीच कारवाई झालेली नाही. एका हिंदु संन्यासिनीवर अशा तर्हेने आक्रमण होऊनही माध्यमांतील कुणीही त्याची नोंद घेतली नाही किंवा माध्यमांना त्याची दखल घेण्यास हिंदूंनीही भाग पाडले नाही. साध्वींना कर्करोग झाला आहे. त्या अंथरुणाला खिळून आहेत. त्यामुळे जामीन मिळण्यासाठी त्यांनी अर्ज केला. तेव्हा हेच निधर्मी काँग्रेस शासन आणि त्यांचे पोलीस यांनी साध्वींच्या जामिनास अटीतटीने विरोध केला.
४ आ. 'दिलीप पाटीदार' - पोलिसांच्या 'हिंदु आतंकवाद' सिद्ध करण्याच्या षड्यंत्राचे बळी ! : २००८ या वर्षी दिलीप पाटीदार नावाच्या हिंदु तरुणाला महाराष्ट्राच्या आतंकवादविरोधी पथकाने इंदूर येथून चौकशीसाठी कह्यात घेतले होते. मालेगाव स्फोट प्रकरणात ज्या १२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे, त्यात दिलीप पाटीदार हे नावच नाही. याचा अर्थ दिलीप पाटीदार याला पोलिसांनी अटक केलेली नाही. मग तो त्याच्या घरी असायला हवा होता; मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज ६ वर्षांनंतरही तो त्याच्या घरी परतलेला नाही. पोलिसांनी त्याला ठार मारले असणार, अशी माझी निश्चिती आहे, तशीच खात्री त्याच्या कुटुंबियांनाही असल्याने त्यांनी मध्यप्रदेश उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सी.बी.आय.कडे) सोपवले. सी.बी.आय.ने या प्रकरणी महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाच्या अनेक पोलिसांची चौकशी केली. पुढे महाराष्ट्राच्या आतंकवादविरोधी पथकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी महाराष्ट्राच्या गृहविभागाची अनुमती हवी होती. ती मागणारे पत्र अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या गृहविभागाकडे येऊन पडले आहे; मात्र त्याला अनुमती न मिळाल्याने केंद्रीय अन्वेषण विभागाने ते प्रकरणच बंद करण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे.
४ इ. अटकेत असलेले काही जण स्फोट घडतांना त्या ठिकाणापासून शेकडो कि.मी. दूर असल्याचे सिद्ध झाल्याने 'हिंदु आतंकवाद' हे षड्यंत्र उघड ! : मालेगाव स्फोट २००६ प्रकरणाचे अन्वेषण प्रथम महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने केले. त्यात काही मुसलमान तरुणांना अटक करण्यात आली होती. काही काळाने त्याच प्रकरणाचे अन्वेषण पुन्हा राष्ट्रीय अन्वेेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.) केले. तेव्हा या प्रकरणात अटक असलेले काही जण स्फोट झाला, त्या वेळी त्या ठिकाणापासून शेकडो कि.मी. दूर असल्याचा दावा राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने केला आणि तसे पुरावेही सादर केले. मालेगाव स्फोट २००८ प्रकरणात अटकेत असलेले मूळचे संघाचे कार्यकर्ते सुधाकर चतुर्वेदी हेसुद्धा स्फोट घडला, त्या वेळी त्या ठिकाणापासून १२०० किलोमीटर लांब त्यांच्या गावी असल्याचे पुरावे आम्ही आता द्यायला सिद्ध आहोत; मात्र राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा त्याकडे लक्षच देत नाही; कारण त्यामुळे चतुर्वेदी यांना सोडावे लागेल !
५. पुस्तकातून 'हिंदु आतंकवाद' या संकल्पनेचा भांडाफोड केल्याने बिथरलेल्या पोलिसांची धमकी !
या पुस्तकातून हिंदूंना आतंकवादी म्हणून सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी रचलेले कुभांड उघडे पडल्याने 'हिंदु आतंकवाद' या राज्यकर्त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी निर्मिलेल्या धादांत खोट्या संकल्पनेलाच तडा गेला आणि पोलिसांची नाचक्कीही झाली. महाराष्ट्रातील दैनिक 'नवाकाळ' या वृत्तपत्राने या पुस्तकातील एक प्रकरण जसेच्या तसे छापले. त्याच दिवशी ४-५ पोलीस सनातनच्या पनवेलच्या आश्रमात मला शोधत आले आणि त्यांनी तेथे स्वत:जवळील पिस्तुल काढून दाखवून त्याचा वापर करण्याची धमकीही तेथील साधकांना दिली. मी त्या दिवशी धर्मसेवेनिमित्त बाहेर असल्याने वाचलो. या पोलिसांनी ते पुणे गुन्हे शाखेमधील असल्याचे सांगितले; मात्र पुणे पोलिसांत चौकशी केली असता, त्यांच्या नावाचे तेथे कोणीही नसल्याचे समजले. या व्यक्तींनी आणलेल्या गाडीच्या क्रमांकावरून शोध घेतला असता, ती गाडी महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकातील अधिकारी राजन घुले यांच्या नावावर असल्याचे लक्षात आले.
६. पुस्तकामुळे 'हिंदु आतंकवादा'विषयीचे सत्य बाहेर आल्याने समाजातूनही 
सदर संकल्पना हद्दपार होण्यास साहाय्य होणे
हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर समाजातून अनेक भ्रमणभाष आले. अनेकांनी त्यांची मते आणि अभिप्राय दिले. पुण्यातील ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या प्रभात शाखेत या पुस्तकाचे सामूहिक वाचन केले जाऊ लागले. अनेक वाचकांनी अशी प्रतिक्रिया नोंदविली, "हिंदूंच्या विरोधात इतक्या खालच्या थराला जाऊन काँग्रेसचे राजकारण चालू असेल, असे आमच्या कल्पनेतही नव्हते. या पुस्तकामुळे ते समजले आणि भविष्यात हिंदूंवर येणार्‍या संकटाची जाणीव होऊन अंगावर शहारे आले." अनेक प्रसिद्ध दैनिकांत या पुस्तकाची परीक्षणे छापून आली. 'हिंदूंना आतंकवादी संबोधणे', हा देश-विदेशात हिंदूंची प्रतिमा मलीन करणारा गंभीर विषय आहे. ईश्वरी कृपेने 'मालेगाव बाँबस्फोटामागील अदृश्य हात' या पुस्तकाचे हिंदी संस्करणही सिद्ध झाल्याने हा विषय आता भारतभर पोहोचेल. आपल्या सर्वांना भेट देण्यासाठी मी येथे पुस्तके आणली आहेत. 
'मालेगाव बाँबस्फोटामागील अदृश्य हात' या पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही 'भगवा आतंकवाद' ही राजकीय अंधश्रद्धा आहे, याविषयी जागृती करण्याचा प्रयत्न केला. एवढ्याने हे षड्यंत्र रोखले जाणार नाही. त्यासाठी याविषयावर आपल्या सर्वांकडून देशभर जागृती केले जाणे आवश्यक आहे. त्यासाठी या पुस्तकाचा आपल्याला लाभ होईल. स्थानिक वृत्तपत्रांत यांविषयी लेख प्रसिद्ध करून अल्प वेळेत व्यापक जागृती करता येईल. हे कार्य आपल्या सर्वांकडून घडो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !                                             
॥ जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ॥

No comments:

Post a Comment