Wednesday, 9 July 2014

भारतीय संस्कृतीवर घाला घालणारा विकृत इतिहास मांडल्यामुळे अली जे. नाटकाला विरोध !

अधिवक्ता संजीव पुनाळेकर
     हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांचा महंमद अली जीना यांचे उदात्तीकरण असलेल्या अली जे. या नाटकाला विरोध का आहे, हे जाणून घेण्यासाठी जर्मनीहून आलेल्या ब्रिंडुसा या महिला पत्रकाराने हिंदु विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांची नुकतीच मुंबई येथे मुलाखत घेतली. या मुलाखतीचा संपादित भाग आमच्या वाचकांसाठी येथे प्रसिद्ध करत आहोत. 
      (एकाही भारतीय पत्रकाराला जे वाटले नाही, ते एका जागरूक जर्मन महिला पत्रकाराला वाटून त्यांनी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या राष्ट्रीय सचिवांची मुलाखत घेतली. यावरून भारतातील पत्रकारिता ही पराकोटीची असंवेदनशील आणि मरणासन्न अवस्थेला पोहोचली आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. भारतीय पत्रकार अशी जागरूक पत्रकारिता शिकतील, तो सुदिन ! - संपादक) 
नाटकातून मुसलमान चांगले असून हिंदुबहुल भारत हा संधीसाधूंचा देश आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न ! 
प्रश्न : अली जे. या नाटकाला आपला विरोध कोणत्या कारणांमुळे आहे ? 
उत्तर : 
१. अली जे. या नाटकात भारतीय संस्कृतीच्या प्रतिष्ठेवर जाणीवपूर्वक घाला घातला असून भारताचा इतिहास विकृत स्वरूपात मांडण्यात आला आहे. म्हणूनच या हिंदूविरोधी नाटकाला आमचा विरोध आहे. 
२. अशाप्रकारच्या हिंदूविरोधी कृत्यांना विरोध करणार्या हिंदु जनजागृती समिती सारख्या विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांना हिंदु विधिज्ञ परिषद आवश्यक ते साहाय्य करते. 

३. अली जे. हे नाटक काल्पनिक आहे, असा दावा करण्यात येत असला, तरी यातील पात्रांची नावे ही इतिहासातील नेत्यांशी मिळती जुळती आहेत. म्हणूनच ती आक्षेपार्ह आहेत. 
४. या नाटकातील पात्रांची नावे अशी आहेत. 
अ. अली जे. : या नाटकातील मुख्य पात्राचे नाव महंमद अली जीना यांच्याशी जुळते. जीना भारताच्या फाळणीला कारणीभूत होत. हे मुख्य पात्र गोध्रा दंगलीतील आरोपी म्हणून दाखवले आहे. हे मुख्य पात्र (अली जे.) मी गोध्रा दंगलींतील पीडित आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न करतो. 
आ. कसाब : अन्य एका पात्राचे नाव कसाब आहे. कसाब हा मुंबईवरील २६/११ च्या जिहादी आतंकवादी आक्रमणातील मुख्य आरोपी होता. त्याने दीडशेहून अधिक भारतियांना मारले. या नाटकातील संवाद अन् कथानक कसाबचे उदात्तीकरण करणारे आहे. 
इ. भारती : या नाटकात एक महिलेचे नाव भारती ठेवले असून ती गरोदर असल्याचे दाखवले आहे. भारती शब्द हा भारतमातेशी जोडणारा आहे. याचा अर्थ महंमद अली जीना यांनी भारतमातेवर लैंगिक अत्याचार केले, असा निघतो. 
ई. यात असलेल्या आणखी एक पात्राचे नाव गांधी यांच्याशी मिळते-जुळते आहे. हे पात्र या नाटकात संधीसाधू आणि जीनांपेक्षा खालच्या पातळीचे दाखवण्यात आले आहे. 
       या सर्व गोष्टी लक्षात घेता, हे नाटक म्हणजे मुसलमान चांगले असून हिंदुबहुल भारत हा संधीसाधूंचा देश आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे आम्ही या नाटकाला विरोध करत आहोत. स्वत:ला सुधारणावादी म्हणवणार्या बेंगळुरूस्थित एका गटाने या हिंदुविरोधी नाटकाची निर्मिती केली आहे. आम्ही प्रतीकेे दाखवण्याच्या विरोधात नाही; परंतु अशी प्रतीके हिंदु धर्मावर आघात करणारी असल्याने त्यास विरोध करणे भाग आहे. 
१. फॅशनेबल सर्वधर्मसमभाव रूजवणार्यां हिंदुद्वेषी संघटना ! 
प्रश्न : परंतु तेसुद्धा हिंदूच आहेत ना ? 
उत्तर : मान्य आहे. हल्ली अतीशिक्षित आणि हिंदु धर्माच्या प्रवाहापासून दूर गेलेले हिंदूच असे कृत्य करतात. त्यांना भारतीय संस्कृृती, परंपरा आणि मूलभूत समस्या यांचा अभ्यास नसतांनाही केवळ फॅशन म्हणून त्याविषयी नाटके वा चित्रपट काढले जातात. अर्थात् याचे कारण म्हणजे अशा हिंदुविरोधी नाटकांना आंतरराष्ट्र्रीय प्रसिद्धीमाध्यमे प्रसिद्धी देतात आणि त्यांच्या बक्षिसांची/पदव्यांची सोय होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे तथाकथित प्रसिद्ध लेखिका अरूंधती रॉय. रॉय यांची पुस्तके भारतात विकलीच जात नाहीत आणि विकली गेलीच, तर ती रद्दीत विकली जातात. असे असूनही रॉय यांना आंतरराष्ट्र्रीय पारितोषिके मिळतात ! म्हणजेच भारतविरोधी लिखाण करणे, हे आता आंतरराष्ट्र्रीय पारितोषिके मिळण्याचा निकष झाला आहे. रामायण आणि महाभारत हे आमचे धर्मग्रंथ आहेत. ते मोठ्या प्रमाणावर विकले जाऊनही त्यांना एकही पारितोषिक मिळत नाही आणि अरूंधती रॉय यांना मात्र मिळते ! मुळात ही पारितोषिके म्हणजे अशासकीय संघटना वा संस्था यांसाठी भारतात येणारा पैसा आहे. अशा संघटना हिंदु संस्कृतीवर टीका करण्यासाठी भारतात फॅशनेबल सर्वधर्मसमभाव रूजवत आहेत. 
२. अस्तित्वात नसणार्या आस्थापनाकडून नाटकाची निर्मिती ! 
प्रश्न् : अशाप्रकारचे नाटक निर्माण झाले, हे आपल्या कधी लक्षात आले ? 
उत्तर : 
१. गेल्या ४ वर्षांपासून हे नाटक केवळ निर्मात्यांच्या परिचितांमध्येच दाखवले जात होते. त्यास विरोध झाला नव्हता. 
२. जेव्हा हे नाटक मुंबईच्या काळा घोडा महोत्सवात दाखवायचे ठरले, तेव्हा आमच्यापैकी काहींच्या हे लक्षात आले. त्याचा अभ्यास केल्यानंतर त्यात काहीतरी चुकीचे असल्याचे आमच्या लक्षात आले. 
३. या नाटकाची निर्मिती करणारी एवम् ही कंपनी प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही ! त्यांनी देशाच्या दंडविधानांचा (कायद्यांचा) भंग केला आहे. स्वत:ची आर्थिक कागदपत्रे शासनाकडे सादर केलेली नाहीत. हे नाटक छोट्या नाट्यगृहांमध्ये दाखवले जात होते. दक्षिण भारतात नाटके प्रदर्शित करण्यापूर्वी शासनाची वेगळी अनुमती घ्यावी लागत नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार लक्षात येत नव्हता. जेव्हा हे नाटक मुंबईत आले, तेव्हा सर्व प्रकार लक्षात आला. त्यानंतर हिंदुत्ववाद्यांनी या नाटकास सर्वत्र विरोध चालू केला आणि वैध मार्गाने ते बंद केले. केवळ हिंदुत्वावर टीका करण्यासाठी असे नाटक करता येणार नाही. 
३. निवेदने, बैठका, निदर्शने इत्यादींद्वारे विरोध ! 
प्रश्न : या नाटकाला तुमचा विरोध कधीपासून आहे आणि तो तुम्ही कशाप्रकारे व्यक्त केलात ? 
उत्तर : काळा घोडा महोत्सवात यापूर्वीही अशा पद्धतीच्या आक्षेपार्ह गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न झाला होता. किंबहुना असे महोत्सव, म्हणजे आक्षेपार्ह गोष्टी दाखवण्याचे व्यासपीठच आहे. त्यामुळे या महोत्सवाकडे आमच्या कार्यकर्त्यांचे लक्ष होते. दक्षिण भारतातही या नाटकाला विरोध झाला होता; परंतु त्याला दाद देण्यात आली नव्हती. म्हणून आम्ही नाटकाची संहिता मिळवली आणि तिचा अभ्यास केला. त्यानंतर आम्ही श्रीराम सेना, अभिनव भारत आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना संपर्क केला. सर्व संघटनांनी सदर नाटकास विरोध करण्याचे ठरवले. त्यासाठी ठिकठिकाणी जनांंदोलने करणे, पोलीस अन् स्थानिक गृहमंत्री यांच्याकडे तक्रार करून या नाटकामुळे देशात अशांतता निर्माण होते असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देणे आदी करण्याचे ठरले. त्यामुळे आम्ही अनेक ठिकाणी प्रबोधनपर बैठका घेतल्या आणि अशाप्रकारे भारतभरात सर्वत्र या नाटकाला विरोध चालू झाला. 
४. वैध मार्गाने केलेल्या आंदोलनाद्वारे शासनावर दबाव ! 
प्रश्न : तुमच्या आंदोलनाचा परिणाम काय झाला, असे तुम्हाला वाटते ? 
उत्तर : या नाटकाच्या विरोधातील सर्व आंदोलने आम्ही शांततापूर्ण मार्गानेच केली. आम्ही संबंधित शासनयंत्रणेला तक्रारीची आणि निषेधाची पत्रे पाठवली. सामाजिक शांतता धोक्यात येऊ नये, म्हणून शासनाला आम्ही प्रतिबंधात्मक आदेश द्यायला लावून कारवाई करण्यास भाग पाडले. हे आम्ही बेंगळुरू, चेन्नई आणि मुंबई या महानगरांत केले. परिणामी या तिन्ही ठिकाणी या नाटकाचा प्रयोग झाला नाही. हे करतांना आम्ही कोणालाही धमक्या दिल्या नाहीत वा मारहाणही केली नाही. सर्व संविधानिक कक्षेत राहून अन् शांततापूर्ण मार्गानेच केले. आम्ही शासनाला आमची शक्ती दाखवून दिली आणि शासनाला हे नाटक बंद करण्यास भाग पाडले. आम्ही शासनला दाखवून दिले की, या प्रकरणात शासनाशी उघड संघर्ष झाला, तर शासनाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. शासनावर आम्ही संंविधानिक मार्गाने दबाव आणला. 
५. असंवेदनशील सदस्यांचे परिनिरीक्षण मंडळ ! 
प्रश्न : बेंगळुरूमध्ये पोलीस आयुक्तांनी या नाटकाच्या प्रदर्शनाला अनुमती दिली होती; परंतु अचानक त्यांनी ती काढून घेतली. एका दिवसातच हे कसे काय झाले ? 
उत्तर : परिनिरीक्षण मंडळावर (सेन्सॉर बोर्डात) ज्या व्यक्ती नेमेल्या असतात त्यांना समाजाची नाडीच माहीत नसते. त्यांच्या नेमणुका राजकीय स्तरावरून झालेल्या असतात. या मंडळामध्ये इतिहासतज्ञ, शिक्षक, मानसोपचार तज्ञ, असे लोक असणे अपेक्षित आहे. एकतर परिनिरीक्षण मंडळ नसावे; पण जर असलेच, तर तेे संवेदनशील असावे. हिंसाचार, लैंगिक अत्याचार आदींपासून त्यांनी समाजाचे रक्षण करावे. जर असे संवेदनशील लोक परिनिरीक्षण मंडळावर नसतील, तर त्यांना त्याची जाणीव करून द्यायला हवी. नाटक वा चित्रपट यांना दिलेली अनुमती मागे घेणे, हे काही पहिल्यांदाच झालेले नाही. कमल हासनच्या चित्रपटाच्या बाबतीतही असेच झाले होते. त्या वेळीही परिनिरीक्षण मंडळाने दबावाखाली त्यांचा निर्णय पालटला होता. एकदा अनुमती दिली म्हणजे ती अंतिम आहे, असे होत नाही. मुसलमान किंवा तथाकथित सामाजिक संघटना यांच्यामुळे शासनाने हिंदुत्ववाद्यांचे कार्यक्रम अचानक शेवटच्या क्षणी रहित करायला लावण्याची सहस्रावधी उदाहरणे आहेत. त्यामुळे आम्ही काहीच चुकीचे केले नाही. 
६. फॅशन म्हणून नाटके करणार्यांना संरक्षण कशाला ? 
प्रश्न : काही ठिकाणी नाटकवाले पोलीस संरक्षण मागत होते. त्यांना त्याची काय आवश्यकता होती ? 
उत्तर : त्यांच्यावर आक्रमण होईल, या भीतीपोटी ते संरक्षण मागत होते. आमचा प्रश्न सोपा आहे, हा देश गरीब आहे. येथे चोर्या्, लहान मुलांचे अपहरण, महिलांवर बलात्कार आदी घटना घडतात. यास आळा घालणे कठीण जात आहे. त्यांच्या संरक्षणासाठी पोलीस संख्या अल्प पडत आहे. असे असतांना जर फॅशन वा हौस म्हणून स्वत:च्या विचारांचा प्रसार करणार्या लोकांना संरक्षण देण्यासाठी पुरेसे पोलीस असतील, तर मग तस्लीमा नसरीन, सलमान रश्दी अशा प्रसिद्ध लेखकांनाही संरक्षण द्यायला हवे. या व्यक्तींना भारतात संरक्षण नाही; पण हौस म्हणून एकत्र आलेल्या लोकांना संरक्षण कशासाठी ? ही मंडळी तस्लीमा नसरीनपेक्षा अधिक बुद्धीमान आहेत का ? म्हणूनच त्यांना देण्यात येणार्या संरक्षणाला आमचा विरोध आहे. 
७. अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणे नाही ! 
प्रश्न : तुम्ही मांडलेली सूत्रे तुमचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे. मग अली जे.च्या निर्मात्यांनी नाटकाच्या माध्यमातून त्यांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य वापरले, असे होत नाही का ? अभिव्यक्तीस्वातंत्र्य दोघांना समान आहे. यावर तुमचे काय म्हणणे आहे ? 
उत्तर : 
१. अभिव्यक्तीस्वातंत्र्य दोघांनाही समान आहेत; पण आम्ही याद्वारे त्यांच्या भावना दुखावल्या जातील, असे काही केलेले नाही. 
२. अभिव्यक्तीस्वातंत्र्याची नेमकी व्याख्या काय आहे, यावर चर्चा झाली पाहिजेे. याविषयी अली जे.च्या निर्मात्यांशी उघड चर्चा करण्यास सिद्ध आहोत. 
३. अली जे.चे निर्माते जर पैशांसाठी किंवा कला म्हणून हे करत असल्याचे सांगत असतील आणि ते विचारवंत म्हणून अथवा परिवर्तनाचा संघर्ष म्हणून काही करत नसतील, तर आमचे म्हणणे त्यांनी ऐकून घ्यायला हवे.
४. या नाटकाचे निर्माते जर स्वत:ला विचारवादी किंवा समाजवादी म्हणवून घेत असतील अन् अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करत असल्याचे सांगत असतील, तर आम्ही त्यास आव्हान देतो; कारण मानवी अधिकार किंवा मूलभूत अधिकार हे व्यक्तीगत नसून ते एक सामाजिक सूत्र आहे. म्हणूनच त्यांच्या दृष्टीने अभिव्यक्तीस्वातंत्र्याची व्याख्या काय आहे, यावर त्यांनी खुली चर्चा करावी. 
५. कॅमेर्यासमोर बोलणे, हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य नसून सदर व्यक्ती केवळ तिचे मत व्यक्त करत आहे, असे समजले पाहिजे. जर मी माझ्या व्यक्तीस्वातंत्र्याचा वापर करून मी महंमद पैगंबरांविषयी वा काँग्रेसच्या एखाद्या मंत्र्याविषयी वा इतरांच्या भावनांविषयी नाटक प्रदर्शित करू इच्छितो, असे म्हटले, तर याला माझे व्यक्तीस्वातंत्र्य म्हणावे का ? मला याचा अधिकार नाही. मला यासाठी कोणी अनुमतीही देणार नाही. जर मला कोणी अधिकार देत नसेल आणि अली जे. नाटकाच्या निर्मात्यांना तो मिळत असेल, तर हा भेदभाव आहे. 
६. म्हणूनच मी अली जे. नाटकाच्या निर्मात्यांशी चर्चा करू इच्छितो. तथापी ही चर्चा त्यांनी व्यक्तीश: न करता समाजिक पातळीवर केली पाहिजे. वैयक्तिक हित जोपासणार्यांसह आम्ही चर्चा करणार नाही. ते एक समाजिक आणि उत्तरदायी व्यक्ती म्हणून आमच्याशी चर्चा करणार असतील, तर त्यांनी सकलतावादी आणि पूर्णतावादी असायला हवे, तसेच ही चर्चा पूर्ण भारताला केंद्रीभूत ठेऊन असायला हवी. या वेळी त्यांना सलमान रश्दी आणि तस्लीमा नसरीन यांच्या विषयीदेखील चर्चा करावी लागेल. 
७. एखाद्या अहंकारी आणि समाजाविषयी असंवेदनशील असणार्या व्यक्तीचे विशिष्ट स्वातंत्र्य जपण्याचे उत्तरदायित्व घेणे समाजाला पेलवणारे नाही. आम्ही समाजासाठी आहोत. आमचे म्हणणे आहे की, एकतर संकुचित व्हा किंवा व्यापक व्हा. निर्णय त्यांचा आहे. तथापी ते व्यापक होणार असतील, तरच ते आमच्याशी चर्चा करू शकतात. जर ते संकुचित राहून चर्चा न करता केवळ स्वत:च्या स्वातंत्र्यापुरतेच पहाणार असतील, तर आम्हाला क्षमा करा. मग येथे केवळ सामर्थ्याचा प्रश्न आहे. ते शासनाच्या माध्यमातून स्वत:चे बळ दाखवत आहात. आम्हीही आमचे बळ दाखवू आणि त्यांचे नाटक वैध मार्गाने बंद पाडू. 
८. युरोपियनांना भारतियांच्या भावना कशा कळणार ?
प्रश्न : युरोपियन लोकांना हिंदी चित्रपट आवडतात. हिंदी चित्रपटांना चांगला प्रतिसाद असतो. यावर तुमचे काय म्हणणे आहे ? 
उत्तर : युरोपियन लोक कदाचित त्याच्याकडे शत प्रतिशत एक कलात्मक दृष्टीने पहात असल्याने त्यांना ते आवडेलही. यदा कदाचित त्या नाटकातील संवाद, दृश्ये, कलाकारांचे हावभाव आणि नाटकातील कथेला दिलेले भावनिक स्वरूप यांकडे ते पाहत असतील. आम्हाला त्यावर काही आक्षेप नाही. तथापी त्या नाटकात रंगवलेल्या ऐतिहासिक घटना, त्यातील कलाकारांना देण्यात आलेली नावे, भारताविषयी दाखवलेला चुकीचा इतिहास आदींवर आमचा आक्षेप आहे. एक युरोपियन नागरिक म्हणून त्यांना या गोष्टींवर काहीच आक्षेप असणार नाही; पण जेव्हा हे नाटक भारतात प्रदर्शित होते, तेव्हा आमचा त्यावर आक्षेप असणारच. येथे भावनांचा प्रश्न येतो. युरोप किंवा अमेरिका येथील लोक भारतातील घटनांविषयी अज्ञानी आहेत. त्यामुळे ते नाटक पहातात. त्यांच्या दृष्टीने ते कलात्मक आहे; पण भारतात ते कलात्मक असू शकत नाही; कारण कुठल्याही माध्यमातून कसाबसारख्या आतंकवाद्याचा उदोउदो करणे योग्य नाही. अन्य कोणीही कसाबकडे केवळ एका पात्राचे नाव म्हणून पाहत असतील; पण त्या नावाशी भारतियांच्या दु:खदायी आठवणी आहेत; म्हणून भारतीय दुखावले गेले असून आम्ही आमचा राग अथवा संताप प्रकट करणारच. आम्ही अशा नाटकाच्या नावाखाली व्यक्तीस्वातंत्र्य आदी गोष्टी मान्य करू शकत नाही. 
९. प्रसारमाध्यमांची हिंदुद्वेषी एकांगी पत्रकारिता ! 
प्रश्न : या नाटकाविषयी तुम्ही निर्माते वा माध्यमे यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करू शकता ना ? माध्यमांचा पर्याय तुम्ही निवडता का ? 
उत्तर : हे नाटक सध्या प्रदर्शित झाले आहे. आम्ही या नाटकाचे निर्माते आणि पोलीस यांना आंदोलनाविषयीचे पत्रही दिले आहे. या व्यक्ती वृत्तवाहिन्यांवर आमच्या विरोधात बोलण्यास उपस्थित असतात. मी मुंबईमध्ये बर्याच ठिकाणी विविध विषयांवरील चर्चेसाठी गेलो आहे. मकबूल फिदा हुसेनच्या चित्रांच्या विरोधात जेव्हा मी वृत्तवाहिन्यांवर चर्चेसाठी गेलो होतो, तेव्हा आम्हाला पोलिसांच्या कह्यात देतील, अशी भीती होती. आम्ही चर्चेसाठी जेथे जातो, तेथे आमच्यावर अन्यायच होतो. आम्हाला बोलू दिले जात नाही. चर्चेचे काही नियमही असले पाहिजे. आमचे म्हणणे इतकेच आहे की, आम्ही जे बोलत आहोत, ते ध्वनीमुद्रीत केले जावे आणि आम्हाला अन् त्यांना बोलण्यासाठी किमान २ मिनिटे तरी दिले पाहिजे. चर्चा आयोजित करणारेच पक्षपाती असतात. तुम्ही स्वत:च अभ्यास करू शकता की, ज्या प्रमाणात एवम्च्या निर्मात्यांना प्रसिद्धी दिली गेली, त्या प्रमाणात आम्हाला ती का दिली गेली नाही ? भारतात सर्वाधिक प्रमाणात विकली जाणारी 'टाईम्स ऑफ इंडीया', 'इंडियन एक्सप्रेस' आदी वृत्तपत्रे केवळ त्यांची बाजू मांडतात; मात्र आमच्या मतांना प्रसिद्धीच देत नाहीत. आजच्या घडीलाही मी चर्चेसाठी सिद्ध आहे; मात्र ती साचेबद्ध आणि नियमांना धरून झाली पाहिजे. तेथे प्रत्येकाला बोलायला समान कालावधी दिला गेला पाहिजे. अशी चर्चासत्रे आयोजित करून ती मुद्रित करून सर्वांसमोर मांडली गेली पाहिजेत; पण ही मंडळी त्यासाठी सिद्ध नाहीत. १-२ टक्के प्रसिद्धीमाध्यमांचा अपवाद वगळता, सर्व प्रसिद्धीमाध्यमे हिंदुविरोधी, पक्षपाती अन् विकली गेेली आहेत. चर्चेत आम्ही एकही अपशब्द किंवा अक्षेपार्ह शब्द बोलत नसतांनाही आमचे ध्वनीक्षेपक बंद केले जातात. आम्हाला बोलू दिले जात नाही. यावर आम्ही काय करायचे. गप्प बसून रहायचे का ? जर त्यांच्याकडे पैशांचे बळ आहे, तर आमच्याकडे मनुष्यबळ आहे. आम्ही रस्त्यावर उतरू. आंदोलन करू. हे सविनय असले, तरी याच्या कायदेविषयक परिणामांनाही आम्ही सामोरे जाऊ. शासनाला जी पाऊले उचलायची आहेत, ती उचलू देत. आम्हीही सिद्ध आहोत. 
१०. नाटकातील पात्रांची नावे पालटा ! 
प्रश्न : अली जे. या नाटकात जर पालट केले, तर त्याच्या प्रदर्शनाला काही विरोध नाही, असे तुमचे म्हणणे आहे. यात पालट करायचेच झाले, तर तुम्ही काय पालट कराल ? 
उत्तर : या नाटकातील मुख्य नायकाचे अली जे. हे नाव पालटले, कसाब या पात्राचे नाव पालटले, गोध्रा ऐवजी काही दुसरे नाव घेतले, म्हणजेच सर्व आक्षेपार्ह नावांऐवजी कोणतीही अन्य नावे घेतली, तर आमचा काहीच आक्षेप असणार नाही. असे करण्यास ते सिद्ध आहेत का ? नावे पालटण्यामुळे या नाटकातील कलात्मक दृष्टीकोनात काहीच फरक पडणार नाही. मग पात्रांची नावे पालटण्यात त्यांना काय अडचण आहे ? त्यांनी नावे पालटावी. गोध्रा ऐवजी बर्लीन हे नाव द्यावे, अली जे. ऐवजी याकुब असे नामकरण करावे, भारती या मुलीचे नाव मार्गरेट ठेवावे. अशाप्रकारे पालट करून हे नाटक त्यांना दाखवू द्या. आमचा काहीच विरोध नाही. 
११. नावे पालटल्यास नाटकावरील आक्षेप मागे घेणार ! 
प्रश्न् : याचा अर्थ नाटकातील पात्रांच्या नावांत पालट करून नाटक प्रदर्शित करण्यास तुमचा आक्षेप नाही ?
उत्तर : या नाटकातील आक्षेपार्ह नावे पालटून ते प्रदर्शित केल्यास आमचा काहीच आक्षेप अथवा विरोध नाही. हवे तर त्यांना आम्ही शंभर-एक नावे सुचवू. त्यातील हवी ती नावे त्यांनी निवडावी; अन्यथा आम्हाला शंभर-एक नावे द्यावी. आम्ही योग्य नावे निवडण्यास त्यांना सर्वतोपरी साहाय्य करू; पण उद्या जर ते म्हणाले की, आम्ही कसाब या नावाऐवजी दाऊद इब्राहीम हे नाव घेऊ, भारती या नावाऐवजी हिंदुस्थान हे नाव घेऊ, तर ते मात्र चालणार नाही. आमची नावे वापरू नका. असे पालट करून जर नाटक प्रदर्शित केले, तर कसलाच वाद अथवा मतभेद निर्माण होणार नाहीत, एवढेच आमचे म्हणणे आहे. 
१२. हिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी ! 
प्रश्न् : पण हे नाटक बनवणारे आणि त्यात काम करणारे सर्व जण हिंदूच आहेत. यावर तुम्हाला काही सांगायचे आहे का ? 
उत्तर : हेच आमच्यासाठी दुर्दैवी आहे. या हिंदूंना धर्माभिमान अन् धर्मशिक्षण नसल्याने ते धर्मापासून दूर गेले आहेत. त्यांना रामायण, महाभारत, श्रीमद्भगवद्गीता आदी धर्मग्रंथांचे ज्ञान नाही. धर्माविषयीच्या अज्ञानामुळे ते भरकटलेले असून केवळ हौस म्हणून ते स्वधर्माचा अवमान करत आहेत. ते केवळ जन्माने हिंदु असले, तरी कर्माने मात्र हिंदुविरोधीच आहेत. आम्ही त्यांना हिंदु मानत नाही. आम्हाला त्यांना हिंदु म्हणून वागवता येणार नाही. 
१३. हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद धर्मरक्षणासाठी कटिबद्ध ! 
प्रश्न : तुम्ही हिंदूंचे प्रतिनिधित्व करता. त्या विषयी तुम्ही काय सांगाल ? 
उत्तर : आम्ही हिंदु आणि हिंदु धर्माचे प्रतिनिधित्व करतो. त्याचबरोबर हिंदु जनजागृती समिती हिंदूंंचे अधिकार प्रस्थापित करण्यासाठी वैध मार्गाने कार्यरत असलेली संघटना आहे. आम्ही कोणताही राजकीय पक्ष अथवा संघटना यांच्याशी संलग्न नसून कोणतीही निवडणूक लढवत नाही. आमचे संघटन हे मूलभूत सनातन धर्म आणि शुद्ध हिंदुत्व यांचा पुरस्कार करते. केवळ हिंदु धर्माच्या रक्षणासाठी कार्यरत असून या कार्यात अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनाही एकत्रित येतात. आमच्या भावनांचा आदर करणार्याच्या अधिकारांवर आम्ही विनाकारण गदा आणत नाही, याची आम्ही हमी देतो. 
१४. धर्मशिक्षण देणे आणि धर्मद्रोह्यांना विरोध करणे
प्रश्न : आपल्या कार्याचे स्वरूप कसे आहे ? 
उत्तर : थोडक्यात सांगायचे झाले, तर हिंदु जनजागृती समिती पुढील उपक्रम राबवते. 
१. हिंदूंना धर्माचे ज्ञान करून त्यांच्यात धर्माभिमान निर्माण करण्यासाठी विनामूल्य धर्मशिक्षणवर्ग आयोजित करते. 
२. प्रारंभीपासूनच लहान मुलांवर धर्माचे संस्कार व्हावेत, त्यांना धर्मग्रंथांचे महत्त्व समजावे आणि त्यांची वृत्ती सात्त्विक व्हावी, यांसाठी बालसंस्कारवर्ग आयोजित करते. 
३. स्त्रियांनी स्वत:चे रक्षण कसे करावे, हे सांगून त्यांच्यासाठी विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग घेते. 
४. हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या देवतांचा कोणी अनादर करत असेल, तर समिती वैध मार्गाने त्यास विरोध करते, तसेच आवश्यकता भासल्यास त्यांच्या विरोधात न्यायालयीन खटलेही चालवते. 
५. हिंदूंच्या अधिकारांवर गदा येत असेल, सर्वधर्मसमभाव असतांनाही अल्पसंख्यांकांना विशेष सुविधा देऊन हिंदूंना आवश्यक सुविधांपासूनही वंचित ठेवले जात असेल, थोडक्यात अल्पसंख्यांकांना एक आणि हिंदूंना एक वागणूक देऊन भेदभाव केला जात असेल, तर त्या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवते. 
६. हिंदुत्वाचे कार्य करणार्यांना विनामूल्य कायदेविषयक साहाय्य करते. बाँबस्फोट आदी घटनांत अडकलेल्या निर्दोष हिंदूंचे एकही पैसा न घेता वकीलपत्र घेतले आहे आणि त्यात आम्हाला यशही मिळालेले आहे. 
७. बांगलादेशी हिंदूंना त्यांचे अधिकार मिळावे, यासाठी ठिकठिकाणी आंदोलन करणे, मोर्चे काढणे, मोहिमा राबवणे, कायदेविषयक विनामूल्य समुपदेशन देणे, अशा माध्यमांतून हिंदूंंच्या अधिकारांचे रक्षण करण्याचा प्रयत्न हिंदु जनजागृती समिती करते. 
१५. हिंदु राष्ट्राची स्थापन, हेच ध्येय ! 
प्रश्न : आपल्या कार्याची दिशा, धोरणे आणि आपले ध्येय यांविषयी काही सांगू शकता ? 
उत्तर : हिंदु जनजागृती समिती ही एक स्वयंसेवी संघटना असून कोणत्याही राजकीय पक्षाकडून देणग्या घेत नाही. आम्हाला विदेशी आस्थापनांकडून पैसे पुरवले जात नाहीत. भारतातील कायद्यानुसार ज्या संघटनांना विदेशातून आर्थिक साहाय्य मिळते, त्या नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारतातील बहुतेक संघटना, मग ती तिस्ता सेटलवाड यांची संघटना असू दे अथवा अरविंद केजरीवाल यांची, त्यांना युरोप अन् अमेरिकेकडून आर्थिक साहाय्य मिळते. आम्हाला कोणाकडूनही अशाप्रकारचे आर्थिक साहाय्य मिळत नाही. सामान्य माणसाने दिलेल्या अर्पणातून आम्ही कार्य करतो. आमची संघटना नोंदणीकृत आहे. आम्ही खर्चाचा वार्षिक अहवाल देतो. आम्ही हिंदु धर्माच्या रक्षणासाठी कार्यरत आहोत. संविधानात योग्य पालट व्हावेत, या मताचे आम्ही आहोत आणि हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचे आमचे ध्येय आहे. भारताचे संविधानसुद्धा आम्हाला स्वत:च्या धर्माचा वैध मार्गाने प्रचार करण्याचा अधिकार देतेे. आम्ही हे सर्व संविधानिक मार्गानेच करत असून संविधानिक मार्गानेच जनमानसांत हिंदु धर्माविषयी जागृती करत आहोत.

No comments:

Post a Comment